सणासुदीच्या काळातील एफडीएचा दणका ३ हजार ६९१ किलोग्रॅम मिठाई, खवा जप्त

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍याना एफडीएने आक्रमक भूमिका घेतली आहे. सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत सणासुदीच्या कारवाया अनुषंगानेछत्रपती संभाजीनगर शहरात काल संध्याकाळी उशिरापर्यंत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. एकूण ३ हजार ६९१ किलो ग्रॅम, सुमारे ६ लाख रुपयांचा संशयास्पद मिठाई व खवा साठा जप्त केला आहे. राज्यभरात राबवल्या जात असलेल्या  मसुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्रफ  या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
 
रविवारच्या दिवशी झालेल्या या कारवाईत शहरात एफडीएच्या पथकाने शहानूरमियाँ दर्गा चौक परिसरातील डी-मार्टजवळ दोन वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स बसवर छापा टाकून तब्बल ३ हजार ६९१ किलो ग्रॅम, सुमारे ५ लाख ९४ हजार ७३६ रुपयांचा संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा मिठाई व खवा सदृश साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई गुप्तचर विभागाचे (मुंबई आयबी) श्रीनिवास केदार यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई फत्ते करण्यात आली. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे आणि योगेश चिभादे यांच्या पथकाने अत्यंत सतर्कता दाखवत ही धडक कारवाई पूर्ण केली.

दोन ट्रॅव्हल्सवर कारवाई
स्थानिक प्रशासनाने शाहनूरमियाँ दर्गा चौक परिसरातील ट्रॅव्हल्स पार्किंग क्षेत्रात सापळा रचून दोन वाहनांवर एकाचवेळी कारवाई केली. पहिल्या कारवाईत अहमदाबादहून आलेली निलकंठ ट्रॅव्हल्सवर करून २ हजार ७९ किलो ग्रॅम मिठाई साठा जप्त केला. जो ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या साठा आहे. तर दुसर्‍या कारवाईत वीर ट्रॅव्हल्सवर करून २ लाख ४९ हजार २३६ रुपयांचा १ हजार ६१२ एवढा साठा जप्त केला.

नमुने दिले तपासणीला 
अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी दोन्ही ठिकाणच्या अन्नपदार्थांचे कायदेशीर नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. उर्वरित संपूर्ण अन्नपदार्थांचा साठा मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लि. येथे उणे १० डिग्री सेल्सिअस तापमानात सुरक्षित सीलबंद करून ठेवण्यात आला आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत दोषींवर पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.